
Sathi Portal : कृषी उत्पादनात महाराष्ट्राने गतवर्षी विक्रमी वाढ नोंदवली असून, अन्नधान्य उत्पादनात २७ टक्के वाढ झाली आहे. यंदा १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जाणार असून, बियाणे आणि खतांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपलब्धता आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामा बैठकीत दिली. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पांमध्ये हजारो गावांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि भाजीपाला यांची प्रमुख निर्यात होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत वितरित करण्यात आली आहे.
राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी पाच हजार कोटींची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन सज्ज असल्याचे श्री. कोकाटे यांनी सांगितले.
राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी पाण्याच्या योग्य नियोजनावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना डीबीटीमध्ये येत असलेल्या समस्यांचा विचार करुन डिजिटल करन्सीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी सातबारावर शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी खरीप हंगाम तयारीबाबतचे सादरीकरण करताना विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची तसेच नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ‘साथी’ पोर्टलवर बियाणे उपलब्ध करुन दिले जात असून केंद्र सरकारकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून 6,750 गावांमधील 13 लाख 50 हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी 2025-26 मधील पीक कर्ज वाटपाबाबत माहिती दिली. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकात यावर्षी एक लाख कोटींच्या कृषी उत्पन्नाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाविस्तार ॲप, महा डीबीटी योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना, कृषी विभागाची दिशादर्शिका आदी पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. आढावा बैठकीस बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आणि जिल्हा स्तरावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Source :- krishi24.com