
fertilizers and seeds : खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणजे वेळेवर बियाणे, खते आणि दिवसा वीजपुरवठा. ही गरज ओळखून राज्य सरकारने नियोजन सुरू केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात दिलासा देणारी माहिती दिली आहे.
खरीपासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभागासोबत समन्वय ठेवून आवश्यक नियोजन केले जाणार असून, कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना शेतीच्या वेळा सांभाळता याव्यात यासाठी दिवसा शाश्वत वीज उपलब्ध करून देण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. यासाठी तब्बल २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांसाठी मोफत वीज दिली गेली आहे.
पीएम-सूर्य घर योजनेअंतर्गत सौरऊर्जेच्या वापराला चालना दिली जात असून, यामुळे ग्रामीण भागात विजेचा भार कमी होणार आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे वीजबिलही कमी होईल, तसेच शेतीचा कार्यकाल अधिक नियोजित व सोयीचा बनेल.
राज्य शासनाचा हा सर्वंकष प्रयत्न खरीप हंगाम अधिक यशस्वी करण्यासाठी असून, शेतकऱ्यांना वेळेवर सर्व सुविधा मिळाल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होईल., असा विश्वास व्यक्त होताना दिसत आहे.
Source :- krishi24.com