
rainy weather : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कृषी हवामान विभागाने १० ते १४ मे २०२५ या कालावधीत संभाव्य पावसाचा आणि हवामान बदलाचा अंदाज दिला असून, त्यानुसार द्राक्ष, डाळिंब व आंबा पिकांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत.
द्राक्ष पिकासाठी सल्ला
द्राक्ष बागांमध्ये सध्या खरड छाटणीस सुरुवात करण्याचा काळ आहे. ओलांड्यावर असलेली जुनी काडी एक जोडा ठेवून छाटावी. काही ठिकाणी ओलांड्यावरून फुटी मागेपुढे निघण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे केवळ एक जोडा ठेवून छाटणी करावी. फुटी एकसारखी आणि लवकर निघावी यासाठी जुन्या ओलांड्यावर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करावे. दर लिटर पाण्यात २०-२५ मिली हायड्रोजन सायनामाईड याप्रमाणे हे मिश्रण तयार करावे. ही फवारणी विहिरीवर तयार होणाऱ्या नवीन ओलांड्यावर न करता जुन्या काड्यांवर करावी. हवामान कोरडे असताना ही कामे करावीत.
डाळिंब पिकासाठी सल्ला
सध्या डाळिंब बागा कोवळी फूट अवस्थेत आहेत. अशावेळी कोवळे शेंडे खुडावेत आणि फळधारक फांद्या व झाडांना आधार देण्यासाठी बांधणी करावी. मृग बहार किंवा अली मृग बहारासाठी तयार होणाऱ्या बागांमध्ये फळतोडी संपल्यावर झाडांना पाणी द्यावे जेणेकरून दिलेल्या खतांचे योग्य परिणाम मिळतील. बहार धरण्याच्या १ ते २ महिने आधी पाणी बंद ठेवावे. पंधरा दिवसांच्या अंतराने १ टक्के बोरॉन फवारणी करावी. फळतोडीनंतर झाडाच्या भोवती लाल माती किंवा गेरू, क्लोरपायरीफॉस आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड मिश्रणाचे पेठ तयार करून लावावी.
आंबा पिकासाठी सल्ला
नियंत्रित उत्पादनासाठी आंबा बागांची नेमकी नोंदणी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे करावी. बागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांचे आणि फवारणीचे रेकॉर्ड ठेवावे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप वापरावे. फळांची गुणवत्ता व वजन उत्तम राहावे यासाठी त्यावर लक्ष केंद्रीत करावे. कीटक नियंत्रणासाठी लेबल क्लेम औषधांचा वापरच करावा आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसारच उपाययोजना करावी.
या तीनही फळपिकांमध्ये हवामान बदल लक्षात घेता फवारणी, छाटणी आणि इतर कामे हवामान कोरडे असताना करावीत. अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात १० ते १४ मेदरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह वाऱ्यासह पावसाच्या सऱ्याही होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके व साधने सुरक्षित ठेवावीत.
Source : krishi24.com