
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून मिळालेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे.
हळद आणि ऊसाची अशी घ्या काळजी:
सध्या ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, अशा पानांची तोड करून नष्ट करावी. तसेच पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. रासायनिक फवारणीसाठी क्लोरोपायरीफॉस (20%) 30 मि.ली., किंवा इमिडाक्लोप्रिड (17.8%) 3 मि.ली. किंवा ॲसीफेट (75%) 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खोडकिडीच्या नियंत्रणासाठीही क्लोरोपायरीफॉस (20%) 25 मि.ली. किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल (18.5%) 4 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळदीची काढणी, उकडणे व वाळवणे सुरू असताना हवामान पाहून ती सुरक्षित ठिकाणी साठवावी. उन्हाळी तीळ पिकासाठी मध्यम जमिनीत 8-10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 12-15 दिवसांनी सिंचन करावे. तूषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
केळीसह फळबागांची काळजी:
कमाल तापमान वाढल्यामुळे संत्रा/मोसंबीमध्ये फळगळ होत असल्याचे दिसते. बागेला सकाळी किंवा संध्याकाळी योग्य प्रमाणात पाणी द्यावे. फळगळ टाळण्यासाठी 00.00.50 हे विद्राव्य खत 1.5 किलो व जिब्रॅलिक ॲसिड 15 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नवीन लागवड केलेल्या झाडांना सावली द्यावी. केळी झाडांना आधार देऊन पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेले घड वेळेत काढावेत. आंबा झाडांसाठी आच्छादन करून जमिनीत ओलावा टिकवावा व पाण्याचा ताण येऊ नये म्हणून नियोजन करावे. चिकू बागेसही आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन काढणीची कामे लवकर पूर्ण करावीत आणि पिकांची, फळांची साठवण सुरक्षितपणे करावी. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणी, सिंचन आणि संरक्षणाच्या उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.
Source : krishi24.com