
banana and mango gardens : सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या ताज्या सल्ल्यानुसार, केळी आणि आंबा बागा सध्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत असून, योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात सुधारणा शक्य आहे.
घड लागलेल्या केळी झाडांना काठीचा आधार देणे अत्यावश्यक आहे. काढणीस तयार झालेली केळी लवकरात लवकर काढून घ्यावी, अन्यथा उष्णतेमुळे घडांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता आहे. केळीच्या बागेला सरी वरंब्याने पाणी देण्याचे सुचवण्यात आले आहे. जमिनीतील ओलावा टिकून राहावा आणि जमिनीचे तापमान संतुलित राहावे यासाठी झाडांच्या आळ्यात आच्छादन करावे. नव्याने लावलेल्या केळीच्या रोपांना उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी.
त्याचप्रमाणे आंब्याच्या फळांचेही लवकरात लवकर काढणी करावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे आणि आच्छादन करून जमिनीतील ओलावा कायम ठेवावा. नव्याने लावलेली आंब्याची रोपे उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सावली देणे गरजेचे आहे. आंबा बागेतील फुलधारणा, फळधारणा सुधारण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असेही सुचवले आहे.
द्राक्ष उत्पादकांनी काढणीस तयार असलेली फळे वेळीच काढावीत आणि एप्रिल छाटणीसाठी तयारी सुरू ठेवावी. द्राक्ष बागेतील माती सैल करून योग्य खत व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरेल. भाजीपाला उत्पादकांनीही काढणीस तयार असलेली पिके जसे टरबूज, खरबूज, वांगे, भेंडी, मिरची वेळेवर काढून घ्यावीत. पिकात तणविरहितपणा राखण्यासाठी खूरपणी करावी आणि रोपांना गरजेनुसार पाणी द्यावे. मिरची, वांगे व भेंडी पिकांमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास योग्य कीटकनाशकांची फवारणी करून नियंत्रण करावे.
शेतकऱ्यांनी हवामान बदलाची दखल घेत वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास नुकसान टाळून चांगले उत्पादन घेता येईल, असा सल्ला कृषि विद्यापीठाने दिला आहे.
Source :- krishi24 .com