
farmers : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे संपूर्ण शेतीसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.
ऊर्जा विभागाच्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे ४५ लाख कृषी पंप मोफत वीज सुविधेसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी १४ हजार ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या तीन महिन्यांसाठी ७ हजार ९३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा शेतीसाठी वापरण्याचा शासनाचा मानस आहे. सध्या २७ जिल्ह्यांमध्ये २ हजार ७७९ कृषी पंप सौरऊर्जेवर आणण्याचे काम सुरू असून, ऑक्टोबर २०२६ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होतील. मागील नऊ महिन्यांत ३०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, त्यामुळे राज्याची ५ हजार ५०० कोटी रुपयांची बचत होईल.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे. राज्यात ३३/३२ केव्ही उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, तसेच आशियाई बँकेच्या सहकार्याने ७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित बूस्टर पंप देण्याची योजनाही शासन राबवणार आहे.
ऊर्जा निर्मिती अधिक सक्षम करण्यासाठी भुसावळ येथे ६६० मेगावॉट आणि चंद्रपूर येथे ८०० मेगावॉट वीज निर्मिती केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक स्वस्त, शाश्वत आणि दिवसा उपलब्ध होणाऱ्या वीजेचा लाभ मिळणार आहे.
source :- krishi24.com