
krishi salla: हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना 5 % निंबोळी अर्काची किंवा 300 पीपीएम अझाडीरेकटीन 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % – 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 88 ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % – 3 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 60 मिली) किंवा फ्लुबेंडामाईड 20 % – 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 125 ग्रॅम) फवारावे.
उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा 2.5 ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20 मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.
Source :- krishi24.com