Give a missed call to order – 9096633907

मराठवाड्यातले वसंतराव लाड पिकवतात ४० एकरवर करडई…
Vashantrao lad

farmer success story:शाश्वत तेलबियांसाठी देशात तेलबियांचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. काही शेतकरी तेलबिया पिके घेऊन तेलबिया वाढीच्या मिशनला हातभार लावत आहेत. त्यापैकीच एक आहेत मराठवाड्यातले शेतकरी. मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव लाड यांनी यंदा ४० एकर करडईचे पीक घेतले आहे.

श्री. लाड हे प्रतिवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. करडई संशोधन केंद्रद्वारे प्रसारित वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाची त्यांनी पेरणी केली असून हे दोन्ही वाण मराठवाडा विभागात लोकप्रिय झाले आहेत. या वाणांमधील तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायती मध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.

करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते. विशेष करून या पिकास पशुधनापासून तसेच जंगली प्राण्यापासून धोका उद्भवत नाही. याबरोबरच वाढते यांत्रिकीकरण यामुळे करडई या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

दरम्यान श्री. लाड यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शेताला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ प्रवीण कापसे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

या भेटी दरम्यान कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साह्याने होत असल्याने काढणी करणे अवघड असल्याची या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. करडईचे तेल सर्वोच्च दर्जाचे असून त्यास चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना या पिकाचे गुणवत्ता युक्त बियाणे आणि आवश्यक तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. यामुळे करडई सारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहनही त्यांनी केले.

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *