
Grape farming advice : मागील चार दिवसात नाशिकसह सांगलीच्या द्राक्षपटट्यात ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक ३० व ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी पर्यंत कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दिनांक ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान किमान तापमान १६.० अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ८३ ते ८५% तर दुपारची सापेक्ष आद्रता ५७ ते ५९% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ०७ ते १३ कि.मी. दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान तज्ज्ञांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुढील सल्ला दिला आहे.
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांसाठी सल्ला:
१. सर्व द्राक्ष उत्पादक भागामध्ये पुरेसा पाऊस झालेला असल्याने येत्या काही महिन्यांत सकाळच्या वेळेस दव निर्मिती अधिक होण्याची शक्यता आहे. तसेच हा कालविधी दुपारपर्यंतही वाढू शकतो. यामुळे वेलीच्या मध्ये सापेक्ष आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. आर्द्रता वाढल्याने केवडा सारख्या मोठ्या रोगाचे इनोक्युलम सक्रिय होण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या वेळी कोरड्या हवामानामुळे बेरी सेटिंगनंतर द्राक्षबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
२. बुरशीनाशकाच्या वापरापेक्षा द्राक्ष बागेतील रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅनोपी महत्त्वाची भूमिका बजावते. २-३ बेसल पाने काडणे, जास्तीचे कोंब काढून टाकणे, बगलफुटी काढणे, वेरी सेट नंतर पानांच्या तारांवर शूटची व्यवस्था करणे इ. मुळे कॅनोपीमधील सापेक्ष आर्द्रता कमी होण्यास मदत होईल आणि रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीचे आच्छादन वाढू शकेल. (स्त्रोत एन.आर. सी. ग्रेप)
नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसाठी सल्ला
१. भुरी रोगाचे नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल २५ईसी @ ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
२. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे व बोद वाफसा स्थितीत राहतील अशी काळजी घ्यावी व जमिनीवर पडलेला काडीकचरा, पालापाचोळा व खराब सडलेली फळे गोळाकरून नष्ट करून बागेला स्वच्छ ठेवावे.
३. द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता कमी होण्यास मदत होईल.
४. (पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता द्राक्ष पिकातील फवारणीचे कामे पुढे ढकलावीत.)
Source :- krishi24