Give a missed call to order – 9096633907

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, तूर, ज्वारी, गव्हाची अशी घ्या काळजी

Rabi crop: सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.

कापूस पिकाचे व्यवस्थापन:

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.

तूर व्यवस्थापन:

ढगाळ वातावरणामूळे तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत.

शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्बी ज्वारी:

रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

गहू:      

बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. ‍वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

मका: 

वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

Source :- krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *