
यंदा बाजारात खरीप आणि लेट खरीपाच्या कांद्याचे उत्पादन चांगले होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राहतील असा जाणकारांचा अनुमान होता. मात्र नवीन कांदा बाजारात आला, तरी सध्याचे लाल कांद्याचे बाजारभाव लासलगाव व पिंपळगाव बाजारात सरासरी ३ हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. पण आगामी काळात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्यावर दर पडण्याची शेतकऱ्यांची भीती कमी होणार असून पुढील महिन्यातही भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.
याचे कारण म्हणजे कांद्याचा आयातदार असलेल्या श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क घटविले आहे. त्यामुळे भारतीय त्यातही नाशिकच्या कांद्याची निर्यात या भागात वाढणार असल्याचे संकेत फलोत्पादन निर्यातदार संघटनेने दिले असून त्याचा परिणाम म्हणून कांद्याचे भावही टिकून राहण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या वाणिज्य आणि अर्थमंत्री असलेल्या अनुरा कुमार डिस्सनायके यांनी हा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका सरकारने काल दिनांक १ डिंसेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने
कांद्यावरील आयात शुल्क आयात शुल्क ३० वरून १० टक्के केले आहे. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याने या काळात कांद्याची निर्यात वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
आपल्या देशातून दरवर्षी सुमारे २५ लाख टन कांद्याची निर्यात होते. मात्र मागील वर्षी सरकारने निर्यातीवर बंधने आणल्याने जुलै २४ पर्यंत केवळ अडीच लाख टन कांदा निर्यात होऊ शकल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसते. केवळ श्रीलंकेला सुमारे १० टक्के कांदा निर्यात होते.
यंदा कांदा उत्पादन चांगले असल्याचे अंदाज व्यक्त केल्याने निर्यातीवर बंधने येणार नाहीत असे कांदा व्यापाऱ्यांना वाटते. मागील महिन्यातच भारताने किमान निर्यात मूल्याची ५५० डॉलर प्रति टन ही अट काढून टाकल्याने आता निर्यातदारांनी स्पर्धात्मक दरात कांदा निर्यात करता येईल.
त्यातच काही दिवसांपूर्वी भारताचा महत्त्वाचा कांदा आयातदार असलेल्या बांग्लादेशने कांदा आयातशुल्क रद्द केल्याने तेथील कांद्याच्या निर्यातीला गती मिळत आहे. आता त्यात श्रीलंकेनेही आयात शुल्क कमी करून भर घातली असून त्यामुळे भारतीय, त्यातही राज्यातील लाल कांदयाला (रांगडा आणि पोळ) चांगले दिवस येण्याची शक्यता असून कांद्याचे दर आगामी काळात चांगले राहण्याची शक्यता आहे.
लासलगाव येथील व्यापारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की सध्या राजस्थान, कर्नाटक, गुजरात येथील नवा कांदा बाजारात येत आहे. बिहारमधूनही काही टक्के कांदा लागवड होत असून तोही कांदा बाजारात येईल.
असे असले, तरी पावसाने नाशिकचा कांदा खराब झाला असून त्याचे बाजारात येण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळेच सध्या बाजारात कांदा दर टिकून आहेत. आगामी काळात लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आला, तरी कांद्याचे बाजार घसरणार नाही असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Source :- Krishi24