
Maharashtra CM: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीला सर्वाधिक मते मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी कोण?? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपाकडून तर शिंदे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा घोळ महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. दुसरीकडे राजकारणातील भीष्माचार्य समजले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव टाकून राजकारणात उलथापालथ घडविणार का? याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
दरम्यान बहुमताला अवघे १३ आमदार कमी असलेल्या भाजपाने आता आपल्या मित्रपक्षांवर म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली असून भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की झाले आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार १२ अपक्षांना सोबत घेतले, तर भाजपा सत्ता स्थापन करू शकतो. अशा वेळेस त्यांना शिंदे आणि पवार गटाची आवश्यकता लागणार नाही.
महाराष्ट्र विधानसभेत २८८ जागा असून सरकारस्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता असते. सध्या भाजपा आणि अपक्ष एकत्र केले, तर त्यांची बेरीज १४४ इतकी भरत आहे, म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी १ ने कमी. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस यांना २१, १० आणि १६ अशा एकूण ४७ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांच्या १२ संख्येसह एकूण ५९ इतक्या जागा होतात. म्हणजे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची त्यांची शक्यता जवळपास शून्यच उरते.
मात्र राज्यात निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री किंवा भाजपाचा मुख्यमंत्री करण्याबाबत भाजपा आग्रही असून त्यासाठी त्यांनी विविध प्रकारे शिंदे गट आणि अजित पवार गटावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते, तर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेते निवडले आहे. मात्र भाजपाकडून अद्याप गटनेता निवडणे बाकी आहे.
काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे नाराज होऊ शकतात, अशा वेळी ते योग्य वेळ पाहून पुन्हा बंडखोरी करतील आणि राज्यात सत्ता बदल होऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंडखोरी केल्यास आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यास बहुमताचा आकडा गाठू शकतात. सध्या शिंदे गटाकडे ५६ + अजित पवार गटाकडे ४१ अशा एकूण ९५ जागा आहेत. त्यात महाविकास आघाडीकडील ४७ जागा मिळवल्यास एकूण संख्याबळ १४१ इतके होते. म्हणजेच सरकार स्थापनेसाठी केवळ ४ जागा कमी पडतात. सध्या समाजवादी पक्ष, एमआयएम, शेकाप यांच्याकडे तीन जागा आहेत, तर इतर अपक्षांकडे ९ म्हणजेच हे तीन उमेदवार आणि एक अपक्ष या नव्या संभाव्य आघाडीला येऊन मिळाल्यास राज्यात भाजपाऐवजी दुसरेच सरकार स्थापन होऊ शकते.
असे असले तरी सध्या हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही बाजूकडून संभाव्य राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात येत आहे. शिंदे गट केंद्रातही सत्तेत सामील असून शिंदे फुटले तर केंद्रातील सरकारही अडचणीत येऊ शकते. मात्र सध्या तरी असे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लवकरच कोण मुख्यमंत्री होईल याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
Source :- krishi24