Give a missed call to order – 9096633907

 देवगावच्या ज्योती पाटील यांनी अन्नप्रक्रियेतून अशी आणली शेती फायद्यात..
Success story

success story : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत चालला असताना, जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योगाचा हातभार लावून तिनं फक्त स्वतःलाच नव्हे तर इतर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. ही यशोगाथा आहे सौ. ज्योती प्रकाश पाटील यांची!

शेतातून उद्योगाचं बीज…
देवगाव-देवळी ता. अमळनेर येथील ज्योती पाटील या पारंपरिक शेतकरी कुटुंबातील. सततच्या निसर्गाच्या लहरींना सामोरं जात, शेतीतून फारसा फायदा होत नसल्याने, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत काही तरी वेगळं करून मदतीचा हात द्यायचा हे त्यांनी मनोमन ठरवलं.

घरात उडदाची, नागलीची आणि आंब्याची शेती असल्याने त्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगात संधी शोधली. पापड, लोणचं, आवळा सरबत वगैरे तयार करण्यासाठी कच्चा माल घरचाच, त्यामुळे त्यांचं गणित सुचत गेलं.

शासन योजनांचं सक्षम पाठबळ…
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आर्थिक मदत, मशीनरी खरेदीसाठी अनुदान आणि मार्गदर्शन मिळालं. एकूण 10 लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला, त्यातील 7 लाख रुपयांची पापड निर्मिती यंत्रणा शासनाच्या 30% अनुदानासह साकारण्यात आली.

घराच्या धब्यावर उभारलेल्या शेडमध्ये “कुलस्वामिनी पापड उद्योग” या नावाने ज्योतीताईंनी त्यांचे पती प्रकाश पाटील यांच्या मदतीने 2020-21 पासून हा उद्योग सुरु केला.

रोजगारी व उत्पादन क्षमता…
प्रारंभी लहान प्रमाणात सुरू झालेला हा उद्योग आता दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतचे उत्पादन देत आहे. विशेष म्हणजे, हे उत्पादन संपूर्ण सेंद्रीय व रसायनमुक्त असल्यामुळे ग्राहकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पाच प्रकारचे पापड, विविध प्रकारचं लोणचं, आवळा कँडी, मुरब्बा आणि सरबत अशा उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.

ज्योतीताईंचा माल आज इंदोर, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सुरत या शहरांमध्ये जातो. स्थानिक बाजारपेठ आणि वैयक्तिक जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मजबूत ग्राहकवर्ग उभा केला आहे.

ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्त्रोत…
या उद्योगामुळे आज ३ ते ४ महिलांना स्थायी रोजगार मिळाला आहे. गावातील अनेक महिलांनी त्यांचा प्रकल्प प्रत्यक्ष पाहून प्रेरणा घेतली आहे. ‘उमेद’ योजनेतून काही महिलांनी मसाला उद्योग, शेवया बनवणे इ. व्यवसाय सुरू केले आहेत. म्हणजेच ज्योतीताईंनी फक्त स्वतःचा विकास केला नाही, तर इतरांना विकासाची दिशाही दिली आहे.

आत्मनिर्भर महिला…
कोणतीही मोठी शैक्षणिक पदवी नसताना, ग्रामीण भागात राहूनही, पारंपरिक जीवनशैलीतून बाहेर पडत ज्योतीताईंनी दाखवून दिलं आहे की – संकटं आली तरी संधी शोधता येते. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत कौटुंबिक पाठिंबा, शासनाची मदत, आणि स्वतःचा धैर्यशील दृष्टिकोन यांचा फार मोठा वाटा आहे.

आज “कुलस्वामिनी पापड उद्योग” फक्त एक व्यवसाय राहिलेला नाही, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी तो एक दीपस्तंभ बनलेला आहे – स्वावलंबनाचा, जिद्दीचा आणि आत्मनिर्भरतेचा!

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *