Give a missed call to order – 9096633907

यंदा सोयाबीन पेरणीसाठी कुठले वाण वापराल? जाणून घ्या…
Soybean varieties

Soybean varieties :  खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विविध वाणांची उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता आणि हवामानानुसार तग धरण्याची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्नपिक संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या विविध वाणांची माहिती दिली आहे. ही वाणं महाराष्ट्रासह देशभरातील विविध हवामान प्रदेशात लागवडीसाठी उपयुक्त असून, काही वाण विशिष्ट रोग व कीड प्रतिबंधक क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. खालीलप्रमाणे विविध वाणांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे:

▶️ एमएयुएस ७१ (समृद्धी) हे वाण २००२ साली शिफारस करण्यात आले असून, याचा कालावधी ९५ ते १०० दिवसांचा आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन ३० ते ३२ क्विंटल प्रति हेक्टर असून, शेंगा तडकण्यास सहनशील आणि रोग व किडींसाठी प्रतिकारक आहे. जेएस ३३५ पेक्षा १५ टक्के अधिक उत्पादन देणारे हे वाण महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे.

▶️ एमएयुएस १५८ हे वाण २००९ मध्ये सादर झाले असून, याचा कालावधी ९३ ते ९८ दिवस आहे. शेंगा तडकण्यास आणि खोडमाशीला सहनशील हे वाण महाराष्ट्रासाठी योग्य आहे.

▶️ एमएयुएस १६२ वाण २०१४ मध्ये आले असून, १०० ते १०५ दिवसांत तयार होते. यंत्राद्वारे कापणीस योग्य असून, शेंगा तडकण्यास सहनशील आहे. हे मराठवाड्यासाठी उपयुक्त आहे.

▶️ एमएयुएस ६१२ हे वाण २०१८ मध्ये सादर झाले असून, याचा कालावधी ९३ ते ९८ दिवसांचा आहे. विविध हवामानांत तग धरणारे, शेंगा तडकण्यास सहनशील आणि रोग-कीडींसाठी मध्यम प्रतिकारक आहे. हे वाण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतासाठी उपयुक्त आहे.

▶️ फुले कल्याणी (डीएस २२८) हे वाण २००५ मध्ये आले असून, कालावधी ९५ ते १०० दिवस आणि उत्पादन २३-२४ क्विंटल प्रति हेक्टर आहे. हे वाण पिंपरी विभागातील तांबेरा प्रभावित भागासाठी उपयुक्त आहे.

▶️ फुले अरुणी (केडीएस ३४४) २०१३ मध्ये सादर झाले असून, याचा कालावधी ९५ ते ९६ दिवस आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक हे वाण फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने सादर केले आहे.

▶️ फुले संगम (केडीएस ७२६) २०१९ मध्ये सादर झाले आहे. याचा कालावधी १०० ते १०५ दिवस असून, तांबेरा, खोडमाशी आणि मुळकुज या रोगांसाठी प्रतिकारक आहे. हे वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त आहे.

▶️ एएमएस १००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) हे २०१९ मधील वाण असून, ९७ दिवसांत तयार होते. यलो व्हेन मोझॅक व मुळकुज यास प्रतिकारक असून, शेंगा तडकण्यास सहनशील आहे.

▶️ एएमएस १००-३९ हे वाण २०२१ मध्ये आले असून, ९५ ते ९७ दिवसांत तयार होते. चुरडंभुंगा, खोडमाशी, मुळकुज यास मध्यम प्रतिकारक असून, सेंट्रल झोनसाठी शिफारस आहे.

▶️ एमएसीएस ११८८ हे २०१३ मधील वाण असून, कालावधी १०० दिवस आहे. याचे उत्पादन ३० ते ३५ क्विंटल असून, ओलिताखालील लागवडीस उपयुक्त आहे.

▶️ जेएस ३३५ (जवाहर) १९९४ मधील वाण असून, बॅक्टेरियल पुरळसाठी सहनशील आहे. भारतात सर्वाधिक लागवड असलेल्या वाणांपैकी एक आहे.

▶️ जेएस ९३-०५ हे वाण २००३ मधील असून, कालावधी ९० ते ९५ दिवस आहे. विविध रोग व किडींसाठी सहनशील असून, पाने लांबट असून शेंगांची संख्या २० ते २५ टक्के अधिक आहे.

▶️जेएस ९५-६० हे वाण २००६ मधील असून, अतिलवकर तयार होणारे व रोग व किडींसाठी सहनशील आहे.

▶️ जेएस ९७-५२ हे २००८ मधील असून, सेंट्रल झोनसाठी शिफारस केले गेले आहे. रोग व अळ्यांसाठी प्रतिकारक आहे.

▶️ जेएस २०-३४, जेएस २०-२९ आणि जेएस २०-६९ ही वाणे अनुक्रमे २०१४ आणि २०१६ मध्ये सादर झाली असून, लवकर तयार होणारी, रोग व किडींसाठी सहनशील असून चांगली उगमशक्ती असलेली आहेत.

▶️ जेएस २०-११६ हे वाण २०१९ मध्ये आले असून, सेंट्रल झोनमध्ये लागवडीसाठी शिफारस केले गेले आहे. हे वाण चांगले उत्पादन देणारे आणि रोग व किडींसाठी प्रतिकारक आहे.

वरील वाणांची माहिती पाहता शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील हवामान, जमीन प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार योग्य वाणाची निवड करून उत्पादनात वाढ साधू शकते. खरीप हंगामात सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक असल्याने योग्य वाणांची निवड ही यशस्वी शेतीची गुरुकिल्ली ठरते.

Source :- Krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *