Give a missed call to order – 9096633907

या आठवड्यात ऊसासह पिकांचे असे करा व्यवस्थापन…
Manage crops

Manage crops : राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची या आठवड्यासाठी शिफारस केली आहे.

ऊसाचे व्यवस्थापन
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

तीळ:
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

सोयाबीन:
सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

खरीप ज्वारी:
खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

हळद:
हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्ष‍िक तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
आंबेबहार संत्रा/मोसंबी बागेत 00:52:34 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघाड बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा.

Source :- Krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *