Give a missed call to order – 9096633907

यंदाच्या खरिपात घरीच निंबोळी अर्क तयार करण्याच्या सोप्या टिप्स…
Kharif season

Kharif season : रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी व किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता.

निंबोळी अर्क म्हणजे काय?

कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंडअळी, पाने पोखरणारी व देठ कुरतडणारी अळी, फळमाशी, खोडकीडा इत्यादी किडींवर अत्यंत प्रभावी आहे. ५% प्रमाणात फवारणी केल्यास हे किड नियंत्रण सुनिश्चित करता येते.

घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत :
१. निंबोळ्यांची तयारी : बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करा. त्यातील साल व गर काढून फक्त बिया स्वच्छ धुवून सावलीत वाळवा. कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा.

२. निंबोळी पावडर तयार करणे : या बिया खलबत्यात किंवा पल्वरायझरमध्ये बारीक करून ५ किलो पावडर तयार करा. ती ९ लिटर पाण्यात भिजवा. दुसऱ्या भांड्यात १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा भिजत ठेवा.

३. अर्क तयार करणे : दुसऱ्या दिवशी निंबोळी अर्क कपड्यातून गाळा. त्यात साबणाचे द्रावण मिसळा. हे मिश्रण ९० लिटर पाण्यात मिसळून १०० लिटर फवारणीयोग्य द्रावण तयार करा.

फायदे :
प्रभावी कीड नियंत्रण
अत्यल्प खर्च
सहज उपलब्ध व घरच्या घरी तयार करता येणारा उपाय
पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत
उत्पादन खर्चात बचत, नफ्यात वाढ
निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करावा. बाजारातील दर्जाहीन सेंद्रिय किटकनाशकांपेक्षा घरचा अर्क अधिक प्रभावी व सुरक्षित ठरतो.

Source :- krishi 24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *