
Increasing heat : उन्हाळ्याच्या तीव्रतेने शेतकऱ्यांसोबतच पशुपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठीही आव्हान निर्माण केले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विभागीय संशोधन केंद्र अर्थातच ए.एम.एफ.यू. इगतपुरीकडून प्राप्त सल्ल्यानुसार, पुढील काही दिवस हवामान उष्ण व कोरडे राहणार असून कमाल तापमान ४०–४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जनावरांचे संरक्षण आणि उत्पादन टिकवणे फार महत्त्वाचे आहे.
जनावरांची काळजी अशी घ्या:
गाई-म्हशींना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत काम करून घेऊ नये. या काळात जास्त तापमानामुळे प्राण्यांमध्ये उष्माघाताचा धोका वाढतो. जनावरांना सावलीत ठेवावे आणि भरपूर स्वच्छ व थंड पाणी पुरवावे. शेडचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी आच्छादले असल्यास उष्णता कमी होते. शेडमध्ये पंखे, वॉटर स्प्रे आणि फॉगर्सचा वापर करावा. गोठ्याजवळ थंड पाण्याची उपलब्धता ठेवावी. आहारात ओलसर हिरवे गवत, पचण्याजोग पूरक खाद्य, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त द्रावण द्यावे.
शेळीपालनासाठी उन्हाळी व्यवस्थापन:
शेळ्यांना दररोज ५–७ लिटर पाण्याची गरज असली तरी उन्हाळ्यात ती वाढून १५–२० लिटरपर्यंत जाते. त्यामुळे सतत स्वच्छ, थंड आणि मुबलक पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. पाण्याचे तापमान २०–२४ अंश दरम्यान असावे. मातीकुंड किंवा रांजणातील पाणी शेळ्यांना अधिक प्रिय वाटते. याव्यतिरिक्त शेळ्यांना उन्हाळ्याच्या आजारांपासून वाचवण्यासाठी एप्रिल महिन्यात बुळकांडी रोग प्रतिबंधक लस टोचवावी.
कुक्कुटपालनासाठी थंडाव्याची काळजी:
कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना गडद व सावलीच्या शेडमध्ये ठेवावे. शेडमध्ये चांगली हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. छताला पांढऱ्या रंगाचे रंगकाम करून त्यावर गवताच्या पेंढ्या किंवा भाताचा तूस टाकावा आणि ओले ठेवावे. यामुळे शेडच्या आत तापमान कमी राहते. वेळच्या वेळी स्वच्छता करणे आणि पिण्याच्या पाण्याची स्वच्छ सोय करणे आवश्यक आहे.
Source :- krishi24.com