
Rain forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २८ व २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात, तर २८ ते ३० मार्च दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून वारा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहू शकतो. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. शेतकऱ्यांनी याचा विचार करून योग्य ती खबरदारी घेतली तर संभाव्य नुकसान टाळता येईल.
उस पिकाची काळजी:
उस पिकास आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. पिकात तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खुरपणी करावी. वादळी वाऱ्यामुळे उस पडण्याची शक्यता असल्याने शक्य असल्यास बांधावरच्या उसाला आधार द्यावा.
खोड कीड आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसल्यास वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. खोड कीडीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५ टक्के ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाची उघडी परिस्थिती पाहून या फवारण्या कराव्यात, जेणेकरून त्याचा अधिक परिणाम होईल.
हळद पिकाची काळजी कशी घ्यावी?:
हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळू लागल्यास काढणीस उशीर करू नये. हळदीच्या काढणीपूर्वी पाने संपूर्णपणे कापून टाकावीत. हळदीचे कंद योग्यरित्या काढून ते सावलीत वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावेत. काढणीस तयार असलेली हळद वेळेवर उपटणे आवश्यक आहे, कारण पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्यास हळदीच्या कंदांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
अशी घ्या काळजी
दरम्यान हवामानाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होईल. त्यानंतर तापमान २ ते ३ अंशांनी घसरेल. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांना हलके सिंचन द्यावे. उन्हाळी तिळासाठी मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी, तर भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांनी सिंचन करावे. शक्य असल्यास तूषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा आढावा घेऊन शेतीतील कामांची योग्य प्रकारे आखणी करावी, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल आणि उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे.