
Care of mango and pomegranate : या आठवड्यातील वातावरणानुसार द्राक्ष, डाळिंब आणि आंबा यांची काय काळजी घ्यायची याचा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी हवामानच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
द्राक्षावरील काळी बुरशी:
काळ्या बुरशीची लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा दर्जा खालावतो व निर्यातीस अडचणी येतात. प्रादुर्भावग्रस्त बागांमधील प्रादुर्भाव झालेले घड, सिलिकॉनयुक्त सरफॅक्टन्ट ०.३ मि. ली प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून धुऊन काढावेत.
डाळिंबाचे व्यवस्थापन:
अंबिया बहर (जानेवारी-फेब्रुवारी बहर नियमन) बागेची अवस्थाः १००% फळधारणा आणि फळवाढ मशागत यासंदर्भातील काळजी पुढीलप्रमाणे घ्यावी. कोवळी फूट अधिक असेल तर कोवळे शेंडे खुडावे. फळधारक फांद्यांना आणि झाडांना बांधून आधार द्यावा. जेव्हा फळ लिंबू आकाराचे किंवा १०० ग्रॅमचे असेल तेव्हा ऊन चट्टा (सन स्काल्ड) टाळण्यासाठी फळे संरक्षक पिशवीने किंवा झाडांची पूर्ण ओळ क्रॉप कव्हरने झाकावी.
आंब्याचे सिंचन व्यवस्थापन:
वाटाणा ते सुपारी आकाराची फळधारणा झालेल्या बागेतील फळांची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना हिवाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमाला दोन बादल्या (३० लिटर) पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाणी वरीलप्रमाणेच परंतु दोनवेळा (दुप्पट मात्रा) दयावे. जागेवरच रोपे वाढवून (In situ) त्यावर कलमे केल्यास त्यांना पाणी द्यावे लागत नाही. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंबा कलमांना केलेल्या अळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
Source :- krishi24.com