
Important News : विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, शेड नेट असे साहित्य मिळते. आता असे साहित्य स्वत:साठी न वापरल्यास संबंधित शेतकरी योजनांसाठी ब्लॅक लिस्ट होणार असून भविष्यात त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशी तरतूद लवकरच शासन प्रस्तावित करत आहेत.
या प्रकारामुळे जे गरजू आहेत अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. मध्यंतरी पोकरासह कृषी औद्योगिक महामंडळाच्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत्या. काही शेतकऱ्यांनी पोकरा योजनेतून शेडनेट घेतले, पण नंतर ते संबंधित कंपनीला विकून टाकल्याचे दिसून आले. इतर औजारांबाबतही असे अनेक प्रकार राज्यात घडले असून यावर चाप लावण्यासाठी शासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.
म्हणूनच या पुढे कृषी योजनांचा लाभ देताना देण्यात आलेले साहित्य विकल्यास भविष्यात कोणत्याही योजनेस पात्र राहणार असे हमी पत्र लाभार्थ्यांकडून भरुन घेण्यात येणार असून तसे निर्देश कृषी राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी या बाबत बैठकीत सूचना दिल्या आहेत.
दरम्यान महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात यावी. त्यामुळे कालापव्यय टाळता येईल. प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी मॉल उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी. समृद्धी महामार्गालगत शेतकरी बाजार उभारता येतील का याची चाचपणी करावी. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मदत दिली जाते. त्याप्रमाणेच सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास मदतीचा प्रस्ताव वन विभागाने तयार करावा. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसास नोकरी देण्याची तरतूद करण्याचा प्रस्तावही सादर करावा, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.
Source : krishi24.com