
Dairy farming: सध्या हिवाळा सुरू असून प्रत्येक जण आपल्या परिने दुभत्या जनावरांची काळजी घेताना दिसतो. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी आहारासाठी पुढील शिफारशी केल्या आहेत.
शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि एसएनएफमध्ये घट दिसून येते. कारण या काळात ऊर्जेची गरज वाढलेली असते.
थंड हवामानात वाढलेल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी गाईंचा आहाराचे नियोजन करावे. शरीराचे तापमान राखण्यासाठी गाईंना जास्त ऊर्जा लागते. जनावरांना उच्च गुणवत्तेचा चारा द्यावा. आहारात चांगल्या दर्जाचे गवत, कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
हिवाळ्यात गाई, म्हशींच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाद्य नियोजन करावे. हिवाळ्यात जास्त प्रथिनयुक्त आहार दिला गेल्यास उच्च दर्जाच्या प्रथिनांचा अधिक वापराने अॅसिडोसिस होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आम्ल शोषले जात नसल्याने किण्वन पोटाचा (रुमेन सामू कमी होतो. या अॅसिडोसिसचा परिणाम होऊन दूध आणि दुधातील एसएनएफचे प्रमाण कमी होते. त्यासाठी गव्हाणीमध्ये पुरेसा चारा उपलब्ध आहे याची खात्री करावी कोरडा चारा जितका जास्त तितकी शरीरातील ऊर्जा जास्त असते.
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृतिअंक (बॉडी स्कोअर) खालावतो. अशावेळी खाद्यात उर्जेचे प्रमाण अतिरिक्त वाढवून दिले पाहिजे.
थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराची प्रथिने, खनिजे जीवनसत्त्व इत्यादींच्या गरजा बदलत नाहीत. एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या एक अंश फॅरनहाइट तापमानाप्रमाणे एक टक्का जास्त ऊर्जेची पूर्तता पशू आहारातून केली पाहिजे. हिवाळ्यात ऊर्जेची गरज साधारणतः १० ते २५ टक्के इतकी जास्त असते.
Source :- krishi24.com