
krishi salla : सध्याच्या वातावरणात पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.
संत्रा मोसंबीचे व्यवस्थापन
१. मृग बहार धरलेल्या संत्रा/ मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
३. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.
४. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला व्यवस्थापन:
१. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
२. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
३. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
Source :- krishi24