
भारतीय कापूस महामंडळा अर्थात सीसीआयच्या कारभारामुळे तेलाच्या बाजारात ताण निर्माण होऊन सोयाबीन आणि मोहरीचे भाव पडल्याची घटना या आठवड्यात घडली आहे. दुसरीकडे परदेशातील भाववाढीमुळे सोयाबीन तेल, पामतेल, शेंगदाणा तेल यांच्या किंमती वधारले.
कापसामुळे सोयाबीन तेल बियांच्या किंवा मोहरीच्या तेलबियांच्या किंमती कशा घसरल्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण झालेय तसेच. यंदा सीसीआय म्हणजेच कापूस खरेदी महामंडळाने महाराष्ट्रातून सुमारे १८ लाख क्विंटल कापूस खरेदी केली. सध्या बाजारात कापसाचे सरासरी दर ७ हजार १०० असताना या ठिकाणी हमीभावाप्रमाणे खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गर्दी केली.
या खरेदी केलेल्या कापसाची सरकी मात्र कापूस महामंडळाने बाजारभावापेक्षा निम्म्या किंमतीने विकून टाकली. त्यामुळे तेलबिया खरेदीदारांना मोहरी, सोयाबीनच्या तुलनेत स्वस्त पर्याय मिळाला. त्याचा परिणाम म्हणून तेलाच्या बाजारावर ताण येऊन सोयाबीन व मोहरीच्या किंमती घसरल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे, तर शेंगदाणा तेलावरही त्याचा परिणाम झाल्याचे तेल बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान मागणी कमी असल्याने मागील सप्ताहात मोहरीचे दर घसरले आणि तेलाचेही दर उतरले. दुसरीकडे सोयाबीनची खरेदी हमीभावाप्रमाणे होत असली, तरी अनेक ठिकाणी सरकारी केंद्रावरच हमीभावापेक्षा कमी भाव दिला जात आहे. शिवाय सरकारला सर्वच सोयाबीन हमीभावाने खरेदी करणे शक्य नसल्याने व या खरेदीत मर्यादा असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी सध्या खुल्या बाजारात सोयाबीन विकताना दिसत आहेत. सध्या सोयाबीनचा सरासरी बाजारभाव देशात ४ हजाराच्या आसपास स्थिर आहे.
कापसाच्या सरकी विक्रीसाठी योग्य ते धोरण ठरविण्याची मागणी तेल क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी केली असून त्यानंतरच तेलाच्या किंमतीवर कापसामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होणारे परिणाम कमी होतील असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान सध्या राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळत असून सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळताना दिसत आहेत.
Source :- Krishi24