
Sugarcane FRP :सध्या जास्त भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. दुसरीकडे साखर कारखानेही ऊसाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊसाची पळवापळवी करताना दिसत आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीसह ऊस दरावर परिणाम होऊ शकतो.
होय हे खरे आहे आणि त्याचा फटका थेट राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. ही बातमी म्हणजे साखरेचे बाजारातील भाव घसरले असून प्राप्त माहितीनुसार मागील चार महिन्यांच्या काळात साखरेच्या दरात ८ ते ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या साखरेच्या किंमती सुमारे ३३ हजार रुपये प्रति टन आहेत. त्या ४० हजार रुपये प्रति टन गेल्या तरच शेतकऱ्यांना एफआरपी सह भाव देणे कारखान्यांना शक्य होणार असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
सद्या देशात साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले, तरी १ ऑक्टोबरपासून आजतागायत केवळ सुमारे पावणेतीन दशलक्ष मे. टन साखरेचे उत्पादन झाल्याचे समजते. मागच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन सुमारे ३५ टक्क्यांनी कमी आहे. असे असले तरी निवडणुकांमुळे भाव पडल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही, पण राज्यात झालेल्या निवडणुकांमुळेच सध्या देशातील साखरेचे भाव पडल्याचे साखर व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निवडणुकांसाठी पैसा लागणार होता, तो उभारण्यासाठी महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित कारखान्यांनी मागील दोन ते अडीच महिन्यात बाजारातील आवश्यकतेपेक्षा जास्त साखर विकली. त्यामुळे साखरेच्या किंमती घसरल्या आहेत. आता हेच साखर कारखानदार शेतकऱ्यांना ऊसाची उचल कशी द्यायची याची चिंता करत आहेत.
Source :- Krishi24